आमदार अमोल खताळांनी कृषिमंत्री भरणेंकडे शेतकऱ्यांच्या बांधावरच मांडल्या व्यथा

संगमनेर (DSNews24) : पावसाने दिलेल्या दीर्घ ओढीमुळे संगमनेर तालुक्यातील खरीप हंगाम संकटात सापडला असून, सोयाबीन, मका, बाजरी, कडधान्यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक भागांत पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण संगमनेर तालुका दुष्काळी जाहीर करून बाधित शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी (दि. २४) संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पावसाअभावी जळालेल्या सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी कृषिमंत्र्यांसमोर तालुक्यातील पावसाची स्थिती, पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीप पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे. पावसातील मोठ्या खंडामुळे सोयाबीन, मका, बाजरी, कडधान्ये तसेच अन्य पिकांना मोठा फटका बसला असून, अनेक ठिकाणी पिके पाण्याअभावी करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम होण्याबरोबरच त्यांच्या आर्थिक गणितावरही मोठा आघात झाला आहे.

शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना प्रशासनाने केवळ कागदी अहवालांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करावी, अशी भूमिका आमदार खताळ यांनी मांडली. पावसाअभावी झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

संगमनेर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करताना काही निवडक गावांपुरता मर्यादित आढावा न घेता संपूर्ण तालुक्याचा सर्वंकष विचार करावा, अशी मागणीही आमदार खताळ यांनी केली. पावसाचे प्रमाण, पिकांची सद्यस्थिती, झालेली पीकहानी आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन संगमनेर तालुका दुष्काळी जाहीर करावा तसेच संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत व दिलासा द्यावा, असे त्यांनी कृषिमंत्री भरणे यांच्याकडे स्पष्टपणे मांडले.

Leave a Comment