आमदारांच्या दुचाकीवर पालकमंत्री; संगमनेरच्या राजकारणात चर्चेचा विषय

संगमनेर : गणेशोत्सवानिमित्त शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी देताना जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासकीय वाहनांचा ताफा आणि लवाजमा बाजूला ठेवत साधेपणाने गणेशभक्तांमध्ये मिसळण्याचा अनुभव दिला. विशेष म्हणजे, आमदार अमोल खताळ पाटील स्वतः दुचाकी चालवत असताना पालकमंत्री विखे पाटील हे त्यांच्या पाठीमागे बसून शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी देण्यासाठी पोहोचले.

पालकमंत्र्यांचा हा साधेपणाचा अंदाज गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांसाठीही लक्षवेधी ठरला. कोणताही मोठा शासकीय ताफा किंवा विशेष व्यवस्था न करता विखे पाटील थेट गणेशभक्तांमध्ये सहभागी झाले. विविध गणेश मंडळांच्या ठिकाणी त्यांनी गणरायाचे दर्शन घेत आरती केली तसेच उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौक मित्र मंडळ, सुतार गल्ली मित्र मंडळ, नेहरू चौक मित्र मंडळ, जय जवान चौक मित्र मंडळ, विद्यानगर तरुण मित्र मंडळ आणि आमदार अमोल खताळ पाटील तरुण मित्र मंडळासह सुकेवाडी येथील महागणपती तसेच महावितरण कंपनीच्या कार्यालयाच्या आवारातील शम्मी गणपतीचे दर्शन घेऊन महाआरती करण्यात आली.

गणेश मंडळांच्या ठिकाणी पोहोचताच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ पाटील यांनी उपस्थित गणेशभक्तांना हात जोडून अभिवादन केले. त्यांच्या साध्या आणि आपुलकीच्या वागणुकीमुळे नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

आमदार अमोल खताळ पाटील यांच्या दुचाकीवरून पालकमंत्री विखे पाटील यांनी केलेला गणेशदर्शनाचा प्रवास हा संगमनेरच्या गणेशोत्सवातील लक्षवेधी क्षण ठरला. शासकीय वाहनांचा ताफा बाजूला ठेवून दुचाकीवरून थेट गणेशभक्तांमध्ये मिसळलेले पालकमंत्री विखे पाटील यांचा हा प्रसंग रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांचेही लक्ष वेधून घेत होता.

Leave a Comment