पीक परिस्थितीचा घेतला आढावा; पीक विम्यासाठी पीक कापणी प्रयोगाच्या प्लॉटचीही तपासणी
संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) महाराष्ट्र शासनाने राज्यातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त तालुके म्हणून घोषित केल्यानंतर संगमनेर तालुक्याचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश झाला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूल विभागाच्या पथकाने साकूर, जांभुळवाडी, मांडवे आणि बिरेवाडी परिसरातील शेतांची पाहणी केली.
तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार संदीप भांगरे, मंडळ अधिकारी विश्वजीत चौगुले, तलाठी सोमनाथ शेरमाळे, तलाठी गणेश सोनवणे, भोरू पारधी आणि आशुतोष वाकडे यांनी विविध गावांतील बाजरी व मका पिकांची पाहणी करून प्रत्यक्ष पीक परिस्थिती जाणून घेतली. यावेळी पावसाअभावी पिकांवर झालेला परिणाम, पिकांची सद्यस्थिती तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी याबाबत माहिती घेण्यात आली.
पीक विम्याच्या दृष्टीने कापणी प्रयोगाच्या प्लॉटची पाहणी
ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळण्याच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या पीक कापणी प्रयोगाच्या प्लॉटचीही तहसीलदार धीरज मांजरे यांनी पाहणी केली.
पीक उत्पादनातील घट आणि प्रत्यक्ष नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी पीक कापणी प्रयोगाला महत्त्व असल्याने संबंधित शेतकऱ्यांच्या शेतातील परिस्थितीची पाहणी करण्यात आली.
डिजिटल क्रॉप सर्वेची नोंदणी करण्याचे आवाहन
दरम्यान, शेतकऱ्यांनी डिजिटल क्रॉप सर्वे ॲपच्या माध्यमातून पीक पाहणीची नोंदणी करावी, याबाबत महसूल अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पीक पाहणीची नोंदणी करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक व अन्य अडचणीही महसूल पथकाने जाणून घेतल्या. यावेळी ग्राम महसूल सेवक आसिफ शेख, पीक पाहणी सहाय्यक संदीप घोडेकर आणि प्रशांत कांबळे उपस्थित होते.
दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषणा झाल्यानंतर प्रशासनाकडून प्रत्यक्ष शेतपिकांची पाहणी सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दुष्काळी उपाययोजना, पीक नुकसान आणि पीक विम्याच्या लाभाबाबत प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.
