बिग ब्रेकिंग! अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोधसाठी सर्वपक्षीय नेते एकवटले.. थोरात – विखे एकत्र…

संगमनेर(DSNews24) अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर एकाच व्यासपीठावर आले. संगमनेर येथे झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांसमोरील संकटे आणि सहकार क्षेत्राची गरज लक्षात घेता निवडणूक टाळून बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याची भूमिका व्यक्त करण्यात आली.

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आजवर सहकार क्षेत्रात राजकारणापलीकडे जाऊन काम करण्याची परंपरा जपली आहे. यापूर्वीही बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा जिल्ह्यातील समविचारी नेत्यांनी जपली आहे. हीच परंपरा पुढे कायम ठेवण्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून जिल्ह्याच्या व्यापक हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसमोर विविध आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे निवडणुकीतून निर्माण होणारी राजकीय स्पर्धा टाळून बँकेचे कामकाज अधिक सक्षम, पारदर्शक आणि प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी सामंजस्याचा मार्ग स्वीकारण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

कोण-कोण उपस्थित?

या बैठकीस माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार आशुतोष काळे, संग्राम जगताप, हेमंत ओगले, विवेक कोल्हे, विक्रम पाचपुते, प्राजक्त तनपुरे, काशिनाथ दाते आणि अक्षय कर्डिले उपस्थित होते.

तसेच श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाने, श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते आणि प्रतापसिंह पाचपुते यांचीही उपस्थिती होती.

आमदार मोनिका राजळे तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी ऑनलाइन माध्यमातून बैठकीत सहभाग नोंदवत बिनविरोध निवडणुकीच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला.

अनुपस्थित नेत्यांशीही संपर्क साधणार

दरम्यान, काही नेते व्यस्त कार्यक्रमांमुळे बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत, तर काहींशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. अशा सर्व नेत्यांशी समन्वय साधून त्यांनाही या भूमिकेसोबत घेण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची संस्था असल्याने तिच्या निवडणुकीबाबत सर्वपक्षीय सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न या बैठकीतून पुढे आला आहे. आता ही भूमिका प्रत्यक्ष उमेदवारी आणि निवडणूक प्रक्रियेत कितपत आकार घेते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment