अहिल्यानगर (DSNews24/किरण पुरी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी ९२ उमेदवारांनी १०० उमेदवारी अर्ज दाखल केले. त्याच दिवशी आणखी १६६ इच्छुकांनी अर्ज नेल्याने आतापर्यंत अर्जविक्रीचा आकडा ८४६ वर पोहोचला आहे. आजी-माजी आमदार, खासदारांसह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार, दि. ५ ऑक्टोबर हा अंतिम दिवस आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय पातळीवर हालचाली सुरू असल्या तरी इच्छुकांची वाढती संख्या आणि दाखल होणाऱ्या अर्जांचा वेग यामुळे बिनविरोध निवडणुकीसाठी नेत्यांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
संगमनेरकडे सहकार क्षेत्राचे लक्ष
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर हे राजकीय आणि सहकार क्षेत्रातील चर्चेचे केंद्र ठरत असल्याचे चित्र आहे. रविवारी माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत संगमनेर येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत जिल्ह्यातील प्रमुख नेते सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्ह्याच्या सहकार राजकारणात संगमनेरचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी समन्वयाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे जागावाटप आणि उमेदवार निश्चितीच्या प्रक्रियेत संगमनेरची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दोन जागा की तीन? चर्चेला उधाण
मागील निवडणुकीत संगमनेर तालुक्याला जिल्हा बँकेत दोन प्रतिनिधित्वाच्या संधी मिळाल्या होत्या. यंदा तालुक्याच्या वाट्याला किती जागा येतात आणि त्या जागांसाठी कोणाला संधी मिळते, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. संगमनेर तालुक्यातील ७१५ मतदार या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे उमेदवार निश्चित करताना विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधित्व, तालुक्यातील गटांचे संतुलन आणि मतदारांचे समीकरण यांचा विचार होण्याची शक्यता आहे.
संगमनेरमधून अद्याप एकही अर्ज नाही
विशेष म्हणजे जिल्ह्यातील अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असतानाच संगमनेर तालुक्यातून अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ५ ऑक्टोबरला संगमनेरमधून कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा संधी मिळणार की नवीन चेहऱ्यांना सहकाराच्या राजकारणात स्थान मिळणार, याकडे तालुक्याचे लक्ष आहे. उमेदवार निवडीमागे कोणते समीकरण राहते, यावरून तालुक्यातील आगामी सहकार राजकारणाची दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
साकूर पठारातून पुन्हा प्रतिनिधित्वाची अपेक्षा
संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागालाही जिल्हा बँकेत पूर्वी महत्त्वाचे प्रतिनिधित्व मिळाले आहे. ज्येष्ठ नेते बाजीराव पा. खेमनर यांनी अनेक वर्षे जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम केले असून, काही काळ त्यांनी बँकेच्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी सांभाळली होती. या पार्श्वभूमीवर यंदा साकूर पठाराला पुन्हा प्रतिनिधित्व मिळणार का, याबाबत पठार भागात चर्चा सुरू आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात साकूरमधून कोणाला संधी देणार का, याकडे साकूरसह संपूर्ण पठार भागाचे लक्ष लागले आहे.
एकीकडे बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे इच्छुकांची वाढती संख्या, जागावाटप आणि उमेदवारांची निवड यामुळे पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. विशेषतः ५ ऑक्टोबर रोजी संगमनेरमधून कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार, याकडे आता तालुक्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.
