‘छाती फाडली तरी साहेबच दिसतील’; शेतकऱ्याच्या वक्तव्यावर शरद पवारांनी असं काही दाखवलं की…

बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार सध्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करत असून, गावागावांत जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. वयाच्या ८६व्या वर्षीही रणरणत्या उन्हात शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बारामती तालुक्यातील जवळार्जुन येथेही त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत दुष्काळ, चारा, पाणी आणि पिकांच्या परिस्थितीची माहिती घेतली.

यावेळी शेतकऱ्यांनी विविध समस्या मांडत पवार यांच्याकडे निवेदने दिली. काही शेतकऱ्यांनी शेतीशी संबंधित प्रश्नांसोबतच वैयक्तिक अडचणीही त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. पवार यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना धीर दिला.

दरम्यान, शेतकऱ्यांशी संवाद सुरू असताना एक मिश्किल प्रसंग घडला. एका शेतकऱ्याने आपल्या कुटुंबाचा शरद पवारांवरील जिव्हाळा सांगताना, “माझे वडील मला बारामतीला घेऊन जायचे. आमचे वडील म्हणायचे की, छाती फाडली तरी साहेबच दिसतील,” असे सांगितले. त्यावर उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.

मात्र, त्या शेतकऱ्याने दिलेले निवेदन हातात घेत पवारांनी त्यावरील लेटरहेडकडे लक्ष वेधले. हे पत्र भाजपच्या लेटरहेडवर असून त्यावर कमळाचे पक्षचिन्ह असल्याचे दाखवत पवारांनी मिश्किलपणे, “मग हे काय आहे?” असा सवाल केला. पवारांचा हा अनपेक्षित सवाल ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Leave a Comment