राहुरी – लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत मुंबईतील एका एजंट महिलेने राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथील एका तरुणाकडून लग्न जुळवून देण्याच्या मोबदल्यात चार लाख रुपये घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित तरुणाचा विवाह लावून दिल्यानंतर अवघ्या महिनाभरात नववधूचे यापूर्वीच लग्न झाले असून, तिला चार मुले असल्याची माहिती समोर आल्याचा दावा नवरदेवाच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी नवरदेव व त्याच्या नातेवाइकांनी नववधूसह तिच्या काही साथीदारांना पकडून राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचोली फाटा येथील एका तरुणाला विवाह करायचा असल्याने तो वधूच्या शोधात होता. याचदरम्यान मुंबई येथील एका एजंट महिलेने त्याची एका तरुणीशी ओळख करून दिली. विवाह जुळवून देण्याच्या मोबदल्यात संबंधित महिलेने तरुणाकडून चार लाख रुपये रोख घेतल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सुमारे महिनाभरापूर्वी संबंधित तरुण-तरुणीचा विवाह करण्यात आला.
विवाहानंतर नववधू सुमारे महिनाभर नवरदेवाच्या घरी राहिली. मात्र, या काळात तिच्या पूर्वीच्या विवाहाबाबत तसेच तिला चार मुले असल्याबाबत माहिती समोर आल्याचा नवरदेवाच्या कुटुंबीयांचा दावा आहे. तसेच तिच्या काही वैयक्तिक सवयींबाबतही माहिती समोर आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचा संशय नवरदेव व त्याच्या कुटुंबीयांना आला.
दरम्यान, नववधूने स्वतःसह चार मुलांच्या सांभाळाची मागणी केल्याचीही माहिती समोर आली आहे. या प्रकारानंतर 2 ऑक्टोबर रोजी दुपारी नवरदेव व त्याच्या नातेवाइकांनी नववधूसह तिच्या काही साथीदारांना पकडून राहुरी पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच चार लाख रुपये घेण्याच्या व्यवहारात कोणकोण सहभागी होते, याचा तपास राहुरी पोलीस करीत आहेत. उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
विवाहाच्या आमिषाने फसवणुकीच्या तक्रारींकडे लक्ष
लग्नासाठी वधू मिळत नसलेल्या तरुणांना लक्ष्य करून विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी अलीकडे समोर येत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येते. गेल्या आठवड्यात राहुरी तालुक्यात अशाच प्रकारे तीन ते चार तरुणांची आर्थिक फसवणूक झाल्याची चर्चा आहे. मात्र, सामाजिक प्रतिष्ठेच्या भीतीमुळे काही जण पोलिसांकडे तक्रार करण्यास पुढे येत नसल्याचेही सांगितले जाते.
विवाहाच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यक्ती किंवा टोळ्यांची चौकशी करून, तक्रारी प्राप्त झाल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, सदर प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
