बिग ब्रेकिंग! साकूर-मांडवे केटिवेअरवरील उपसा सिंचनाचे वीज कनेक्शन बंद होणार!

– एल-निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाचा निर्णय; पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेला प्राधान्य

– ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत जलसाठ्याचे काटकसरीने नियोजन ; शेतकऱ्यांच्या सिंचनावर परिणाम होण्याची शक्यता

संगमनेर (DSNews24/किरण पुरी) एल-निनोच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईचा धोका लक्षात घेऊन उपलब्ध जलसाठ्याचे काटकसरीने नियोजन करण्यासाठी जलसंपदा विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संगमनेर तालुक्यातील साकूर आणि मांडवे येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमधून अधिकृत पिण्याच्या पाण्याच्या वापराव्यतिरिक्त सुरू असलेल्या सर्व उपसा सिंचन योजनांचे वीज कनेक्शन तातडीने पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी बुधवारपासून करण्यात येणार असल्याची माहिती साकूर महावितरणचे सहायक अभियंता राजेशकुमार झा यांनी DSNews24 शी बोलताना दिली. या निर्णयामुळे परिसरातील शेतीच्या सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

संगमनेर पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक अभियंता (श्रेणी-१) यांनी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या संगमनेर उपविभागाच्या उपअभियंत्यांना पत्र पाठवून यासंदर्भात कार्यवाही करण्याची सूचना केली आहे. साकूर येथील वीज वितरण शाखेच्या शाखाधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देऊन संबंधित उपसा सिंचन योजनांचे वीज कनेक्शन बंद करण्याबाबत कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे.

३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत जलसाठा जपण्याचे नियोजन

जलसंपदा विभागाच्या ५ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयाचा आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या ६ ऑक्टोबर रोजीच्या पत्राचा संदर्भ या आदेशात देण्यात आला आहे. एल-निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उपलब्ध जलसाठ्याचे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत काटकसरीने, प्राधान्यक्रमाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संभाव्य पाणीटंचाईच्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुरक्षित ठेवणे हा या नियोजनाचा प्रमुख उद्देश आहे.

या निर्देशांनुसार साकूर आणि मांडवे बंधाऱ्यांमधून अधिकृत पिण्याच्या पाण्याच्या वापराव्यतिरिक्त सुरू असलेल्या सर्व उपसा सिंचन योजनांचे वीज कनेक्शन बंद करण्यासाठी संबंधित यंत्रणांना कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे.

महसूल आणि पंचायत समिती प्रशासनालाही माहिती

या आदेशाच्या अनुषंगाने महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांसह संगमनेरचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि संबंधित सिंचन शाखेला पत्राच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आदेशाच्या अंमलबजावणीसाठी विविध प्रशासकीय यंत्रणांना अवगत करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या सिंचनाचे काय?

साकूर आणि मांडवे परिसरातील बंधाऱ्यांवर अवलंबून असलेल्या उपसा सिंचन योजनांचे वीज कनेक्शन बंद झाल्यास संबंधित योजनांमधून होणाऱ्या पाणीउपशावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या योजनांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसमोर सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून घेण्याचे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.

एकीकडे संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा साठा सुरक्षित ठेवण्याला प्राधान्य दिले जात आहे, तर दुसरीकडे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता हा शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचे संरक्षण करताना शेतीच्या सिंचनावर होणाऱ्या परिणामांचे व्यवस्थापन कसे केले जाणार, याकडे साकूर-मांडवे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment