अहिल्यानगरमध्ये अवैध विदेशी मद्याची मोठी खेप जप्त; १ कोटी ७२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अहिल्यानगर (DSNews24/कैलास पुरी) : महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या दहा चाकी कंटेनरवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली. नगर-मनमाड महामार्गावरील नांदगाव शिवारात करण्यात आलेल्या या कारवाईत विदेशी मद्याच्या १ हजार २५० बॉक्ससह कंटेनर असा एकूण अंदाजे १ कोटी ७२ लाख ४२ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मध्य प्रदेशातील वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. हॉटेल जयविजयसमोर, नगर-मनमाड रोडवरील नांदगाव शिवारात एका दहा चाकी कंटेनरमधून मध्य प्रदेशात विक्रीस असलेले, मात्र महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेले विदेशी मद्य वाहून नेले जात असल्याची माहिती भरारी पथकाचे निरीक्षक सूरज कुसळे यांना मिळाली होती.

या माहितीची खातरजमा करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहिल्यानगर-१ येथील भरारी पथकाने आणि ब-विभागाच्या पथकाने नांदगाव परिसरात महामार्गावर सापळा रचला. यावेळी राजस्थान पासिंग असलेला कंटेनर क्रमांक RJ-32-GE-3013 थांबवून दोन पंचांच्या उपस्थितीत त्याची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कंटेनरमध्ये महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याचा मोठा साठा आढळून आला.

तीन प्रकारच्या विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त

कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मद्यसाठ्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

– गोवा व्हिस्की (७५० मिली) : ७ हजार ६३२ सिलबंद बाटल्या, एकूण ६३६ बॉक्स.

– गोवा व्हिस्की (१८० मिली) : १४ हजार सिलबंद बाटल्या, एकूण २८० बॉक्स.

– बॅगपायपर व्हिस्की (१८० मिली) : १६ हजार ३२ सिलबंद बाटल्या, एकूण ३३४ बॉक्स.

अशा प्रकारे एकूण १ हजार २५० बॉक्समधील विदेशी मद्याचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला कंटेनर जप्त करण्यात आला. या सर्व मुद्देमालाची अंदाजे किंमत १ कोटी ७२ लाख ४२ हजार ९६० रुपये असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

मध्य प्रदेशातील वाहनचालक ताब्यात

या प्रकरणी मुस्तकीम मुंशी खान (रा. वॉर्ड क्रमांक ४, धारड, ता. रतलाम, जि. रतलाम, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ मधील कलम ६५ (अ), ६५ (ई), ८१, ८३, ९० आणि १०३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या मद्यसाठ्याचा स्रोत, वाहतुकीमागील उद्देश आणि त्याच्या वितरणासंदर्भातील पुढील माहिती तपासातून स्पष्ट होणार आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे आणि पुणे विभागाचे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशानुसार, तसेच अहिल्यानगर-१ चे अधीक्षक नितीन घुले आणि उपअधीक्षक प्रविणकुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

भरारी पथकाचे निरीक्षक सूरज कुसळे, ब-विभागाचे निरीक्षक बाबुराव घुगे, दुय्यम निरीक्षक ए. एन. जावळे आणि व्ही. जी. चव्हाण यांच्यासह जवान, महिला जवान आणि वाहनचालकांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक सूरज कुसळे हे अधीक्षक नितीन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

अवैध मद्याबाबत माहिती देण्याचे आवाहन

अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक किंवा विक्रीसंदर्भात कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ८४२२००१९३३ या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.

Leave a Comment