विधान परिषदेत ठाकरे गटाकडे १० तर शिंदे गटाकडे एक आमदार होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ९ आमदार होते. दरम्यान, कायंदे यांनी ठाकरे गटाला रामराम केल्यामुळे आता विधान परिषदेत ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी ९ आमदार आहेत. सध्या विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. तर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाकडे आहे.
परंतु मनीषा कायंदे यांच्या जाण्याने ठाकरे गटाचं विधान परिषदेतलं संख्याबळ कमी झालं आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रश्न विचारला की, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार का? यावर अजित पवार स्मितहास्य करत म्हणाले, तुम्ही हे आमच्या लक्षात आणून दिल्यामुळे आम्ही निश्चितपणे यावर विचार करू.
अजित पवार म्हणाले, आमची महाविकास आघाडी आहे. लगेच तुम्ही काहीतरी बातम्या चालवू नका. विधानसभा, विधान परिषदेत ज्या वेळेस विरोधी पक्षनेतेपद देण्याची वेळ येते त्यावेळी ज्यांच्या सर्वाधिक जागा त्यांना ते विरोधी पक्षनेतेपद दिलं जातं.
२०१४ च्या निवडणुकीनंतर आम्ही (राष्ट्रवादी काँग्रेस) ४१ आमदार होतो, काँग्रेसचे ४२ आमदार होते. तेव्हा शेतकरी काँग्रेस पक्षाचे तीन सदस्य होते, ज्यांना आम्ही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला होता. आमची आघाडी होती. म्हणजेच आमच्याकडे ४४ आमदार होते. तरीदेखील ५ वर्ष ते पद काँग्रेसकडे होतं.
