नाशिक येथील एका कंपनी कामगार तरुणाने स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संदीप नाना शहाणे असे या तीस वर्षीय तरुणाचे नाव आहे.
हा तरुण चासगाव येथील असून सकाळी घरातून बाहेर पडताना बायकोला मंदिरातून दर्शन करून येतो म्हणत, नाशिकरोड परिसरातील पळसे भागातील शिव मंदिराजवळ गावठी कट्ट्याने स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केली.
संदीप हा सातपूरच्या एमआयडीसीत एका कंपनीत कामाला होता. वर्षभरापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. मात्र आज सकाळी घराबाहेर पडत नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या पळसे येथील दारणा नदीजवळील भैरवनाथ मंदिराजवळ संदीप याने आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे.
घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले. त्याचबरोबर घटनास्थळावरून गावठी कट्टा जप्त केला आहे. संदीप याने आत्महत्या का केली, याचे कारण समोर आले नसून तसेच त्याच्याकडे गावठी कट्टा आला कुठून? हा गंभीर प्रश्न देखील पोलिसांसमोर उभा राहतो.
