अहमदनगरच्या शेवगाव येथील जबरी चोरी आणि खुनाच्या घटनेतील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
23 जूनच्या पहाटे शेवगाव येथील जैन गल्ली येथे गोपीकिशन बलदवा यांच्या घरात चोरट्याने चोरी करुन गोपीकिशन बलदवा आणि पुष्पा बलदवा यांची हत्या केली होती.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासासाठी वेगवेगळे पथके रवाना केली होती. यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलं असून पोलिसांनी खेडकर टाबर चव्हाण या आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
चोरी आणि खुनाच्या घटनेनंतर पोलिसांना जैन गल्ली येथील सीसीटीव्ही फूटेज हाती लागलं होतं. त्या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे शोध घेत असताना आरोपीची ओळख स्पष्ट झाली.
खेडकर चव्हाण हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन इथे असल्याची माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे खेडकर चव्हाण याला बिडकीन इथून ताब्यात घेण्यात आलं आहे.
