अहमदनगर : या वर्षभरात मुदत संपणार्या जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतची प्रभाग रचना मार्च महिन्यांत जाहीर करण्यात आली होती. आता प्रभाग रचनेवर प्रारूप आरक्षण जाहीर करण्यात आले असून या प्रारूप आरक्षणावर 3 जुलैपर्यंत हरकती मागवण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
जानेवारी ते एप्रिल या कालावधीत मुदत संपणार्या 78 ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त आहेत. त्यानंतर मुदत संपणार्या 110 अशा 188 ग्रामपंचायतींचा प्रभाग रचना कार्यक्रम मार्च महिन्यांत पूर्ण करण्यात आला होता. दरम्यान, जानेवारी ते डिसेंबर 2023 या वर्षभरात मुदत 195 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. समोचित आयोगाच्या सुचनानुसार 7 ग्रामपंचायतीचे आरक्षण अपूर्ण आहे.
त्यामुळे या ग्रामपंचायती वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने उर्वरित 188 ग्रामपंचायतची प्रभाग रचना तयार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रशासनाने 17 मार्च रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली. या प्रभागा रचनेबाबत 24 मार्चपर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या.
उपविभागीय अधिकारी यांनी उपलब्ध हरकतीवर सुनावणी घेतली. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेतल्यानंतर प्रशासनाने आता जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवरील प्रारूप आरक्षण जाहीर केले आहे. या प्रारूप आरक्षणावर हरकतींसाठी येत्या 3 जुलैपर्यंत हरकती दाखल करण्यास मुदत आहे.
