बिग ब्रेकिंग! समृद्धी महामार्ग बस अपघात प्रकरणी मोठी कारवाई

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर आज (शनिवार) पहाटे बसला झालेल्या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू तर आठ जण जखमी झाले आहेत. बस अपघात प्रकरणी वाहनचालक दानिश शेख इस्माईल शेखला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खाजगी बसच्या अपघाताची आरटीओ विभागाकडून करण्यात आलेल्या चौकशीत काही धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत.

समृद्धी महामार्गावर टायर फुटून अपघात झाला नसून बस रोड दुभाजकावर आदळल्याने अपघात झाला आहे. गाडीचा वेग जास्त असल्याने दुभाजकला गाडी घासली त्यात बसच्या समोरचा एक्सेल तुटल्याने बस उलटली.

यावेळी डिझेल टँक फुटल्याने घर्षण होऊन आग लागल्याचा प्राथमिक अहवाल आरटीओने दिला आहे. समृध्दी महामार्गावर मोठ्या वाहनांनी तिसऱ्या लेन मधून जाणे अपेक्षित असतानाही बस दुभाजकावर आदळली. याचा अर्थ चालकाने नियमांचे उल्लंघन केले असल्याचे स्पष्ट होत असल्याचे मत नागपूर ग्रामीण आरटीओचे निरीक्षक राहुल धकाते यांनी नोंदविले.

सोबतच वाहकांची ब्रेथ अनालयझरने तपासणी करणे आवश्यक असून त्याची अंमलबजावणी केली जात असून वाहक नशेत असेल तर अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे ब्रॅथ अनालयझार तपासणी करणे गरजेचे असल्याचे देखील धकाते यांनी स्पष्ट केले आहे.

विदर्भ ट्रॅव्हल्स बस चालकाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल…
आरटीओच्या प्राथमिक अहवाल आल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वाहन चालकाला अटक केली. वाहनचालक दानिश शेख इस्माईल शेखवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयपीसी 304, मोटर व्हेईकल ऍक्ट 134, 184, 279 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निष्काळजीपणे वाहन चालवून 25 जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका वाहन चालकावर ठेवण्यात आला आहे.

Leave a Comment