गाडीवर झाड कोसळले… सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चालक ठार

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल कासोदाकडे एका प्रकरणाच्या चौकशीसाठी गेलेल्या आर्थिक गुन्हे शाखा पथकाच्या गाडीवर झाड कोसळलं. यात नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर यांच्यासह चालक अजय चौधरी यांचं दुर्दैवी निधन झालं आहे. या घटनेनं नाशिक पोलीस क्षेत्रावर मोठा आघात झाला आहे.

नाशिक शहरातील आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर हे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल कासोदाकडे जात होते. आर्थिक गुन्हे शाखेचं हे पथक पिलखोड येथील एका प्रकरणाच्या तपासासाठी जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हे पथक अंजनी धरणाजवळून जात असताना पथकाच्या गाडीवर झाड कोसळले. या अपघातात सहाय्यक पोलीस निरीक्षक दातीर यांच्यासह चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवाने दुर्दैवी घटना घडली. तर चंद्रकांत शिंदे, निलेश सूर्यवंशी, भरत जेथवे हे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. स्थानिकांच्या मदतीने जखमी पोलिसांना बाहेर काढण्यात आले. दरम्यान, या घटनेने संपूर्ण नाशिक पोलीस क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Comment