Vikhe vs Thorat : मंत्री विखे पाटील म्हणाले, बाळासाहेब थोरातांनी ‘त्या’ पराभवाची जबाबदारी….

Vikhe vs Thorat : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सडकून टीका केली आहे.

“२०२४ मध्ये शिंदे-फडणवीसांविरोधात जनमत जाईल,” या थोरातांच्या वक्तव्यावर बोलताना विखेंनी “त्यांनी आधी नाशिकमधील मविआ उमेदवाराच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारावी,” असा टोला लगावला. ते सोलापूरमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “मला वाटतं नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकासआघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला. बाळासाहेब थोरातांनी आधी त्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ते महत्त्वाचं आहे. त्याबद्दल थोरात का बोलत नाहीत.”

“प्रत्येकजण आपल्या सोयीप्रमाणे अर्थ काढत आहे. कसबा निवडणुकीवरून प्रत्येकाला परिस्थिती बदलली आहे असं वाटत आहे. प्रत्येकाचं स्वप्नरंजन सुरू आहे. ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ प्रत्येकजण पाहत आहे. ती स्वप्नं पाहणं आम्ही थांबवू शकत नाही. ती स्वप्नं पाहण्याचा आनंद त्यांना घेऊ दिला पाहिजे,” असं मत राधाकृष्ण विखेंनी व्यक्त केलं.

दरम्यान, शरद पवारांच्या विधानाबाबत विचारण्यात आलं असता, त्यांनी पवारांवर खोचक शब्दात टीका केली. “शरद पवारांनी आता स्वप्नरंजन करणे थांबवले पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये भविष्यकारांची संख्या वाढली आहे. रस्त्याच्याकडेला पूर्वी जे पोपट बसत होते, त्यांची उपासमार तुम्ही का करता? भविष्य सांगणं त्यांचं काम आहे, ते काम त्यांना करू द्या, असे ते म्हणाले. तसेच देशात सध्या कोणतेही बदलाचे वारे नाहीत आणि असा बदल करण्याची जनतेचीदेखील इच्छा नाही”, अशी प्रतिक्रिया विखेंनी दिली.

Leave a Comment