बसमध्ये सीटवर बसण्यावरुन झालेल्या क्षुल्लक वादातून एका महाविद्यालयीन तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील न्यू आर्ट्स कॉलेज महाविद्यालया समोर ही घटना घडली. या हल्ल्यात सदर तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. युवराज गुंजाळ असे जखमी तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
काय आहे प्रकरण?
युवराज गुंजाळ हा तरुण नेहमीप्रमाणे बसने कॉलेजला चालला होता. यावेळी बसमध्ये सीटवरुन त्याचा काही तरुणांशी वाद झाला. याच वादाचा राग मनात धरुन आरोपींनी तरुणाचा कॉलेजपर्यंत पाठलाग केला. यानंतर कॉलेजसमोरच विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केला. यानंतर हल्लेखोर पसार झाले.
महाविद्यालयासमोरच हा हल्ला झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी तरुणाला अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा कसून शोध सुरु आहे.
