कुकडी पाटबंधारे विभागाच्या धनगरवाडी (ता. श्रीगोंदा) जलाशयातून पाणी उपसा परवानगी प्राप्त करून दिल्याच्या मोबदल्यात शेतकर्याकडून दीड हजाराची लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक दोन कार्यालयातील दप्तर कारकून याला रंगेहाथ पकडले.
सुभाष यादवराव वाबळे (वय 56 रा. जकाते वस्ती, स्टेशन रस्ता, श्रीगोंदा) असे त्याचे नाव आहे.
हंगेवाडी (ता. श्रीगोंदा) येथील शेतकर्याची बोरी (ता. श्रीगोंदा) येथे शेत जमीन आहे. त्यातील एक हेक्टर क्षेत्रासाठी धनगरवाडी जलाशयातून पाणी उपसा करण्याची परवानगी मिळण्याबाबतचा अर्ज त्यांनी कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक दोन, श्रीगोंदा यांच्याकडे केला होता.
सदर परवानगी प्राप्त करून दिल्याच्या मोबदल्यात दप्तर कारकून वाबळे याने शेतकर्याकडे दोन हजार रूपये लाचेची मागणी केली होती.
याबाबत संबंधीत शेतकर्याने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाने शनिवारी (दि. 12) पडताळणी केली असता वाबळे याने पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती दीड हजार रूपयांची लाच मागणी करून रक्कम स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. वाबळे विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
