शिर्डी लोकसभा मतदार संघावर 2009 पासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे शिर्डी ही शिवसेनेचीच असून आगामी लोकसभा निवडणुकीमध्येही त्याठिकाणी भगवाच फडकणार. त्यासाठी कंबर कसून तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पदाधिकार्यांना दिले.
मुंबई येथे मातोश्रीवर आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जिल्ह्यातील पदाधिकार्यांची बैठक उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकार्यांना लोकसभेच्या तयारीला लागा असे आदेशित केले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, श्रीरामपूर माजी शहर प्रमुख सचिन बडधे, लखन भगत, राधाकिसन बोरकर, नेवाशाचे हरिभाऊ शेळके, अकोलेचे मच्छिंद्र धुमाळ, जनार्दन आहेर, कोपरगावचे राजेंद्र झावरे आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
शिर्डी लोकसभा मतदार संघ हा 2009 पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 2009 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-रिपाइंचे उमेदवार रामदास आठवले यांचा पराभव करून शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे या मतदार संघातून प्रचंड मताने विजयी झाले. त्यानंतरच्या 2014 लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाऊसाहेब वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने ऐनवेळी शिवसेनेची उमेदवारी पदरात पडलेले सदाशिव लोखंडे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.
2019 मधील लोकसभा निवडणुकीमध्येही शिवसेनेच्या तिकीटावर सदाशिव लोखंडे खासदार झाले. मात्र राज्यातील राजकीय घडमोडीत खा. लोखंडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्याने त्यांच्या विरोधात प्रबळ उमेदवार देण्यासाठी कालच्या मुंबईतील बैठकीत विचारमंथन करण्यात आले.
यावेळी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जिल्ह्यातील पदाधिकार्यांशी संवाद साधत स्थानिक परिस्थिती जाणून घेतली. आणि आगामी लोकसभा निवडणूक सोपी करुन शिर्डी लोकसभा मतदार संघावर भगवा फडकविण्यासाठी तयारीला लागा, असे आदेश दिले.
