अहमदनगरच्या ‘त्या’ घटनेवर नाना पटोले म्हणाले…..

अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील हेरगाव येथे कबुतर चोरल्याच्या संशयावरून एका दलित तरुणाला अर्धनग्न करून झाडाला बांधून अमानुष मारहाण करण्यात आली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे.

भारतीय जनता पक्षाने राजकीय फायद्यासाठी समाजात जो द्वेष पसरवला आहे, त्यातूनच या घटना घडत आहेत. भाजपने देशाच्या सामाजिक ऐक्याला गालबोट लावले आहे अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील घटनेचा तीव्र निषेध करून पटोले म्हणाले की, राजकीय फायद्यासाठी भारतीय जनता पक्षाने देशात द्वेषाची बीजे रोवली आहेत त्याचा परिणाम देशवासियांना भोगावे लागत आहेत. भाजपने राजकीय फायद्यासाठी हिंदू आणि मुस्लीम समाजात फूट पाडून दंगली घडवल्या.

त्यानंतर भाजपने सवर्ण आणि दलितांमध्ये फूट पाडण्याचे काम सुरु केले आहे. त्यातून अगोदर भीमा कोरेगावची दंगल घडवली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी संबंधित लोक सातत्याने मुस्लीम आणि दलितांबद्दल द्वेषाची पेरणी करत आहेत.

त्यातूनच सामाजिक ऐक्याला तडे गेले असून हेरगाव सारख्या घटना घडत आहेत. या घटनेतील आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पटोले यांनी केली.

Leave a Comment