Sharad Pawar : पारनेरमध्ये ‘शरद पवार – गो बॅक’ आंदोलनाला भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा पाठिंबा

पारनेर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) हे 10 मार्चला पारनेर दौऱ्यावर येणार आहेत. मात्र या दौऱ्याला पारनेर कारखाना बचाव आणि पुर्नर्जीवन समितीने विरोध दर्शविला आहे.

कारखाना बचाव समितीकडून ‘शरद पवार-गो बॅक’ आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री मागे शरद पवारांचाच हात असल्याचा आरोप बचाव समितीने केला आहे. याबाबत कारखाना बचाव समितीने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. पारनेर बचाव समितीने पवारांना लिहिलेल्या पत्रात पारनेर कारखाना विक्रीबाबत एकूण 25 प्रश्न उपस्थित केले आहे.

या प्रश्नाचा खुलासा दौर्‍यापूर्वी पवारांनी करावा असं या पत्रात म्हटलं आहे. या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर न दिल्यास पवारांच्या दौर्‍यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली जाईल असा इशारा कारखाना बचाव समितीकडून देण्यात आला. तसेच या आंदोलनाला भूमिपुत्र शेतकरी संघटनेनेही जाहिर पाठिंबा दिला असल्याची माहिती संस्थापक संतोष वाडेकर यांनी दिली आहे.

त्यामुळे शरद पवारांच्या दौऱ्यात नेमक्या काय घडामोडी घडणार याकडे लक्ष लागले आहे. तसेच शरद पवारांचा पारनेर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील बागायती भागात पहिलाच दौरा आहे. त्यामुळे आयोजकांकडून या दौर्‍याची जय्यत तयारी चालु आहे. त्या पार्श्वभुमीवर पवार – गो – बॅक आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे आयोजन व प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे.

पारनेर साखर कारखाना भ्रष्ट मार्गाने विक्री करून शरद पवारांचे निकटवर्तीय असणारे माजी खासदार विदुरा नवले यांनी तो बळकावल्याचा कारखाना बचाव समितीचा आरोप आहे. पारनेर विकत घेणारी क्रांती शुगर कंपनीने गेल्या 7 ते 8 वर्षांपासून उसाला सर्वात कमी भाव देवून पारनेरच्या शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचे समितीचे म्हणणं आहे.

तसंच, पारनेर कारखान्याच्या उर्वरीत मालमत्ता हडपण्यावर त्यांचा डोळा आहे. पारनेर कारखाना विक्रीतून उरलेली रक्कम, दीडशे एकर संपादित जमिनीचा मोबदला पारनेरला मिळू दिला जात नाही. पोलिसांकडून न्यायालयात खोटा चौकशी अहवाल सादर करणे, शासनाकडील दाखल असलेला पुर्नजीवन प्रस्ताव मंजूर करण्यास हस्तक्षेप करणे, प्रशासनाकडून अवसायक न हटवणे यामागेही पवारांचा हात असल्याचे बचाव समितीचं म्हणणं आहे. त्यामुळे कारखाना बचाव समितीने त्यांना कारखाना कार्यक्षेत्रात येण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे.

Leave a Comment