आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर नाव न घेता टीका केली. एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील, असा टोला रोहित पवारांनी लगावला.
रोहित पवारांच्या टीकेला अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सत्तेत सामील होण्यासाठी सर्वात आधी रोहित पवारांनीच समर्थन दिलं होतं, असा गौप्यस्फोट अमोल मिटकरी यांनी केला आहे. त्यांनी ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट लिहून रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
रोहित पवारांना उद्देशून अमोल मिटकरी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हणाले, “दादा, आपण राजकारणात अजून लहान आणि नवखे आहात. ज्यांच्याविरुद्ध आपण बोलत आहात त्यांनी आपल्यापेक्षा अनेक उन्हाळे-पावसाळे जास्त पाहिलेले आहेत.
सत्तेत सहभागी होताना सर्वप्रथम समर्थन आपलेच होते, याचा मी स्वतः साक्षीदार आहे. आता सरकारला सरकारचे काम करू द्या आणि स्वतःला सावरा.”
