नागालँडमध्ये पुन्हा एकदा भाजप आघाडीचं सरकार येणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीपीपी सर्वात मोठे पक्ष ठरले आहेत. यावेळी राज्यात सर्वपक्षीय सरकार स्थापन केलं जाणार आहे. म्हणजे राज्यात कोणताही विरोधी पक्ष नसेल.
राष्ट्रवादी आणि जेडीयूनेही भाजप आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही अटीशिवाय हा पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात जिंकलेल्या सर्व पक्षांचं सरकार येणार आहे. पहिल्यांदाच राज्यात विरोधी पक्ष नसणार आहे. हे या निकालाचं वैशिष्ट ठरणार आहे.
भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीची माहिती दिली आहे. नागालँडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येत आहे.
तिथल्या स्थानिक समीकरणानुसार दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत. नागालँडचा प्रयोग महाराष्ट्रात होण्याची परिस्थिती नाही, सध्या आम्ही सत्तेत मजबूत आहोत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
