मुंबई – शिवसेनेत मोठी फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राज्यभर दौरा करणार आहे. त्यामध्ये ‘शिवगर्जना शिवसंकल्प सभा’ उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) घेत आहे. नुकतंच, 5 मार्चला उद्धव ठाकरे यांची कोकणातील खेड भागात पहिली जाहीर सभा पडली असून, यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षावर चांगलाच निशाणा साधल्याचे दिसून आलं. पक्ष आणि चिन्ह दोन्ही गेल्यानंतरची उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच सभा होती.
दरम्यान, या सभेवरून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरेंची खिल्ली उडवली होती. “तुमच्यापेक्षा राज ठाकरे(Raj Thackeray)यांच्या सभेला जास्त गर्दी जमते’, अशी खोचक टीका दीपक केसरकर यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी उद्धव ठाकरेंना या सभेवरून कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, आता याच सभेविषयी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार(Ajit pawar) यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काल (दि. 7) अजित पवार अहमदनगर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना उद्धव ठाकरेंच्या सभेविषयी प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला अजित पवारांनी अतिशय मिश्किल उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.
अजित पवार म्हणाले, “विरोधक म्हणतायेत की उद्धव ठाकरेंच्या सभेला आम्ही गर्दी जमवली. पण आमचाच माजी आमदार संजय कदम फुटला. त्यानेच उद्धव ठाकरेंच्या सभेत शिवसेनेत प्रवेश केला आणि आम्ही कशाला गर्दी जमवू…?” असं उत्तर देत असताना अजित पवार मिश्किलपणे हसले.
