किरीट सोमय्यांचा व्हिडिओ दाखवणाऱ्या चॅनलवर केली ‘ही’ कारवाई 

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा अश्लिल व्हिडीओ दाखवल्याप्रकरणी लोकशाही न्यूजवर कारवाई करण्यात आली आहे. माहिती प्रसारण मंत्रालयाने लोकशाही वाहिनी पुढील 72 तासांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.

यासंदर्भात लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. यावरून आता राज्यातील नेत्यांनी भाजपवर जोरदार टिका केली आहे.

किरीट सोमय्या बातमी प्रकरणी माहिती प्रसारण मंत्रालयाने लोकशाही वाहिनी आज संध्याकाळी ७ वा. पासून पुढील ७२ तास बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

आदेश वाहिनीला संध्याकाळी ६.१३ वाजता. प्राप्त झाले आहे. सदर आदेशबाबत कायदेशीर सल्ला घेत आहोत. कोरा कागद निळी शाही, आम्ही कुणाला भीत नाही. असं कमलेश सुतार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कमलेश सुतार यांनी ट्विटवर तोंडावर पट्टी असलेला फोटो शेअर केला आहे. त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, खरंतर आज ही पट्टी भाजप खासदारांच्या आणि त्यांच्या मागे बसून निर्लज्जपणे दात दाखविणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांच्या तोंडावर पाहिजे होती.

किती लोकांचे तोंड दाबतील? सरकारविरुद्ध आवाज दिवसेंदिवस बुलंद होतोय! कमलेश सुतार तुमचा आवाज सरकारने फक्त ७२ तासांसाठी बंद केला आहे. २०२४ मध्ये या सरकारचा आवाज नेहमीसाठी बंद होणार आहे. असा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला दिला आहे.

Leave a Comment