साकूरमध्ये भटकंती करणारा चेनय्या तब्बल १४ वर्षानंतर पोहोचला तेलंगणात….

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर गावात सन २०१७ पासुन चेन्नया या नावाचा एक मनोरुग्ण अनेक वर्षांपासून विमनस्क अवस्थेत भटकंती करत फिरत होता. वेळेप्रसंगी उपाशी राहून तो गावातील पडक्या वाड्यात तर कधी श्री बिरोबा महाराज मंदिरात, कधी स्मशानभूमीत तर कधी बस स्टँडवरच राहून प्लास्टिक बाटल्या तसेच भंगार गोळा करून आपली पोटाची भूक आणि उपजीविका भागवत होता.

तसेच त्याला कधी चेनाया तर कधी कन्हैय्या अश्या दोन्हीं नावाने गावातील लोक ओळखत होते. परंतु त्याची दैनंदिन चांगली वागणुक पाहून गावातील नव तरुणांनी मिळून त्याचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने अहमदनगर येथील सामाजिक कार्य करणाऱ्या स्नेहालय या संस्थेतील स्नेह मनोयात्री प्रकल्पात संपर्क केला.

त्यानंतर स्नेह मनोयात्री प्रकल्प प्रमुख रमाकांत, हरिदास आणि इतर टीमने चेन्नय्या यास उपचारास घेऊन जाण्यासाठी तातडीनं साकुर येथे पोहोचले. आणि त्यास गावातून किशोर बनसोडे आणि अशोक सोनावणे यांच्या मदतीने पुनर्वसन करण्यास ताब्यात घेऊन अहमदनगर येथील स्नेहालय प्रकल्पात त्याचे उपचार आणि पुनर्वसन करिता पाठवले. तसेच स्नेहालयमध्ये मिळालेले प्रेम, आपुलकी आणि औषध उपचाराने तो व्यवस्थीत होत आहे.

हे पाहून कार्यकर्त्यांनी पद्मश्री आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त डॉक्टर भरत वटवाणी , कर्जत , जि.रायगड येथील स्नेह श्रद्धा फाउंडेशन येथे त्याची रवानगी पुढील मोठ्या उपचारासाठी केली. जवळपास पंधरा दिवस तिथे उपचार घेताच तो पूर्ववत झाला आणि मागील पंधरा वर्षात झालेला सर्व प्रवास त्याने हळूहळू सांगण्यास सुरुवात केली. तसेच महामार्गावर तेलंगणा राज्यातील ट्रक ड्रायव्हर्सशी संपर्क करून त्याला बोलते केले.

कुटुंबातील सदस्यांची नावे, कोणत्या राज्यात राहतो हे सर्व त्याने सांगितले आणि टीमने तेलंगणा राज्याकडे त्याच्या घरी पोहोचविण्यात आले. गावाच्या वेशीजवळ त्याला सोडताच चेन्नया आपल्या घराकडे धावतच पोहोचला. आणि १४ वर्षांनंतर चेनय्याला त्याचे कुटुंब मिळालेय.

दरम्यान मिळालेल्या माहिती प्रमाणे चेन्नया याचे मूळ नाव वेंतुरी अंजण्यायुलू आहे. तसेच त्याचे तेलंगणा राज्यातील कोरपोले (मेदक) गाव आहे. त्यास एकूण तीन भावंडे व एक बहीण असून तो पूर्वीपासूनच अविवाहित होता. गावाकडे सर्व भावंडे मिळून शेती विषयक काम एकत्रीत करीत होती.. गावातील काही लोकांनी त्यांच्या कुटुंबीयांशी शेतावरून वादविवाद झाल्याने सर्वांना मारहाण केली.

याचा मनावर ताण आल्याने चेन्नया वेड्यासारखे वागू लागला. कुटुंबाने त्याला एरगडा मेंटल हॉस्पिटल , तेलंगणा येथे उपचारासाठी सुमारे दोन वर्ष ठेवले. परंतु काही महिन्यातच त्याला डिस्चार्ज होऊन रुग्णालयातून तो न कळत बाहेर पडला. भाऊबंदांनी आणि कुटुंबीयांनी त्याचा तेलंगणामध्ये अनेक वर्ष शोध घेतला. तो न सापडल्याने शेवटी तो मृत झाला असे समजून त्यांनी शोध घेणं शेवटी थांबविल.

परंतु हॉस्पिटल मधून बाहेर पडलेला चेन्नया त्याच्या मानसिक अवस्थेमध्ये तेलंगणातून रेल्वे मध्ये बसून थेट महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कदाचित तो राहिला. अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील साकूर येथे शेवटी तो पोहोचला असावा.. परंतु शेवटी अनेक व्यक्तींनी त्याच्या स्वगृही पोहोचण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.

Leave a Comment