संगमनेर : बिरेवाडीच्या नवीन सरपंचपदाची निवड कधी होणार? वाचा…

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील सरपंच निलम ढेंबरे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने सरपंचपदाची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे नवीन सरपंचपदाची निवड कधी होणार याचीच चर्चा सध्या सुरू आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी सरपंचपदाच्या निवडीचा कार्यक्रम कधी जाहीर करणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात बिरेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली होती. तसेच या निवडणुकीत शेतकरी गटाने ९ पैकी ६ जागा जिंकून ग्रामपंचायतीवर कब्जा मिळवला होता.

दरम्यान, शेतकरी विकास गटाच्या (कॉंग्रेस) विचारानूसार सरपंचपदासाठी एक, दीड तसेच अडीच वर्षं असा कालावधी वाटून घेण्यात आला होता. या ठरलेल्या वाटपानुसार १७ ऑगस्ट २०२३ रोजी एक वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर विद्यमान सरपंच निलम ढेंबरे यांनी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा ३१ ऑगस्ट २०२३ रोजी दिला.

त्यानंतर सरपंचपदाची जागा रिक्त झाली आहे. परंतु जवळपास एक महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही सरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली नाही. त्यामुळे निवड प्रक्रिया लांबणीवर पडते की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे. बिरेवाडीला नवीन सरपंच कधी मिळणार याची जोरदार चर्चा परिसरात रंगली आहे.

Leave a Comment