बाळासाहेब थोरात यांनी वाढविला नगरचा सस्पेन्स

नगर लोकसभेची जागा पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस लढते. मात्र या वेळी ही जागा कोणी लढवायची, याबाबत अजून चर्चा झालेली नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील आमच्या तिघांमध्ये चर्चा झाल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, अशा शब्दात नगरचा सस्पेन्स आमदार बाळासाहेब थोरात यांनी वाढविला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नगर लोकसभा मतदारसंघ काँग़्रेसने लढवावा व या ठिकाणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. दोन दिवसांपूर्वीच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन नगरची जागा राष्ट्रवादीच लढविणार असल्याचे जाहीर केले होते.

त्यामुळे उत्कंठा वाढलेल्या नगरच्या जागेसंदर्भात बोलताना आमदार थोरात म्हणाले, की लोकसभेच्या जागावाटपाची अजून कोणतीही चर्चा झालेली नाही.

राज्यातील 48 जागांवर आमच्या तिन्ही मित्रपक्षांमध्ये चर्चा होईल. यातून जागावाटप होईल. यात नगरची जागा कोणी लढवायची यावर निर्णय होईल, असे स्पष्ट केले. मात्र नगरची जागा पूर्वीपासूनच राष्ट्रवादी लढवत असल्याचेही त्यांनी या वेळी आवर्जून सांगितले.

Leave a Comment