जुन्नर : मराठा समाजाला सरकारने आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात सगळीकडे साखळी उपोषण सुरू आहे. सरकारने आता मराठा बांधवांचा अंत पाहू नये.
सरकारने तीन दिवसांचे विशेष अधिवेशन घेऊन आरक्षणाचा विषय मार्गी लावायला हवा. राज्यात 150 हून अधिक आमदार मराठा आहेत.
मीसुद्धा मराठा आमदार असून, मराठा बांधवांनी माझ्या राजीनाम्याची एकत्रित मागणी केली तर मराठा समाजापेक्षा आमदारकी मोठी नाही, त्यामुळे माझी आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी आहे, अशी घोषणा जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी केली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नारायणगाव येथे गेल्या तीन दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी उपोषणस्थळी भेट दिली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मराठी बांधवांनी एकत्रितपणे माझ्या राजीनाम्याची मागणी केली तर मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. समाजपेक्षा मी मोठा नाही.
तसेच सरकारने तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे आणि त्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय घेऊन हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा.
