महाराष्ट्रात आधी शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली. दोन्ही पक्षातील नेत्यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केली. मात्र काँग्रेस पक्षात कोणतीही फूट पडली नव्हती.
परंतु आता मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळविल्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसमधील मोठा आमदारांचा गट भाजपात जाण्याचा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. पण काँग्रेस फुटीच्या बातम्या काही मंडळींकडून जाणीवपूर्वक पेरल्या जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करताना म्हटले की, ट्रिपल इंजिन सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे, सरकारमध्ये सुरू असलेल्या बेबंदशाहीमुळे सर्वसामान्य जनता हवालदिल आहे. महागाई आणि बेरोजगारी सर्वोच्च पातळीवर आहे. या सर्व नकारात्मक वातावरणात नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.
विरोधी पक्ष एकजुटीने लढतो आहे. अशावेळी संभ्रम निर्माण करण्याच्या हेतूने काँग्रेस फुटीच्या बातम्या काही मंडळींकडून जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत. माध्यमेही या गोष्टीला प्रसिद्धी देत आहेत. मात्र राज्यातील काँग्रेस संदर्भातील या बातम्या धादांत खोट्या आणि खोडसाळपणाच्या आहेत. काँग्रेस एकजूट आहे. जनविरोधी सरकारच्या विरोधात आम्ही संघर्ष करत राहू, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.
