राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठं थंडी तर कुठं ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. दरम्यान, 7 डिसेंबर पासून राज्यातील वातावरण कसं असणार याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात सध्या ढगाळ वातावरण आहे. तसेच विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया अशा 6 जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर शुक्रवारपासून म्हणजे 8 डिसेंबरपासून वातावरण पूर्णपणे निवळून थंडीला सुरवात होण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रातील तीव्रतेत जाऊन महाराष्ट्र भू-भागावर वळणारे कमी दाब क्षेत्र पश्चिमेकडे सरकून समुद्रातच विरळण्याची शक्यता आहे. त्यामुळं सोमवार म्हणजे 11 डिसेंबर ते बुधवार दिनांक 13 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील अपेक्षित किरकोळ पावसाची शक्यताही आता मावळली असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
