अकोला(DSNews24 ) शासनाच्या विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळविणाऱ्या, लौकिक निर्माण केलेल्या कापशी रोड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आई व उपसरपंचपदी मुलगा असा योगायोग घडून आला आहे. जनतेतून सरपंच व सदस्यांनी उपसरपंच निवडला. एकाच कुटुंबात दोन्ही पदे गेली आहेत.
कापशी रोड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी यापूर्वी अंबादास उमाळे कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात विविध विकासकामे सुरू होती. दरम्यानच्या काळात निवडणूक झाली. या निवडणुकीत सरपंचपदी त्यांची आई वेणूताई उमाळे यांना गावकऱ्यांनी निवडले.
त्यानंतर मंगळवारी (ता. ५) उपसरपंचपदाची निवडणूक झाली. यात सदस्यांनी सर्वानुमते अंबादास उमाळे यांना उपसरपंच नेमले. यातून गावकऱ्यांनी विकासकामासाठी त्यांच्यावर जबाबदारी सोपवल्याचेही स्पष्ट झाले.
आई सरपंच व मुलगा उपसरपंच झाल्याने एक आगळावेगळा विक्रमही बनला. शिवाय गावकऱ्यांनी आदर्शसुद्धा निर्माण केला. आई-मुलगा प्रमुख पदांवर असल्याचा हा दुर्मीळ योगही यानिमित्ताने साधला आहे. सरपंचपदासाठी यापूर्वी म्हणजेच ५ नोव्हेंबरला मतदान व ६ नोव्हेंबर मतमोजणी झाली होती. तर उपसरपंचपदाची निवडणूक मंगळवारी घेण्यात आली.
