संगमनेरी शेळीने दिला पाच करडांना जन्म 

राहुरी – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे अ. भा. समन्वित शेळी सुधार प्रकल्पाद्वारे संगमनेरी शेळ्यांचे जतन, संवर्धन व गुणवत्ता वाढीसाठी जातिवंत संगमनेरी बोकड शेळी पालकांना पैदासीसाठी दिले जातात.

याअंतर्गत संगमनेर केंद्रातील हिवरगाव पावसा येथील शेतकरी अनिल दशरथ गोफणे यांच्या संगमनेरी शेळयांच्या कळपातील शेळ्यांनी विद्यापीठाने दिलेला नर एस.एम.-410 द्वारे प्रजनन केलेल्या दोन शेळ्यांना प्रत्येकी चार करडे व एका शेळीने पाच करड़े देण्याचा विक्रम केला आहे.

राहुरी विद्यापीठाच्या संगमनेरी शेळी सुधार प्रकल्पाने भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या सहाय्याने नामशेष होत असलेल्या संगमनेरी जातीच्या शेळ्यांची संख्या 3 हजारांवरून 5० हजारांपर्यंत नेण्यात यश मिळविले आहे.

हा प्रकल्प कार्यक्षमरित्या राबविण्यासाठी कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार व पशुसंवर्धन विभागप्रमुख डॉ. दिनकर कांबळे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे संगमनेरी शेळी सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विष्णू नरवडे यांनी सांगितले.

सदर करडांची शास्त्रोक्त पद्धतीने जोपासना व संगोपन करण्यासंबधीचे मार्गदर्शन संगमनेर केंद्रातील प्रक्षेत्र गणक प्रवीण फटांगरे करत आहेत.

Leave a Comment