अजित पवार यांना मुख्यमंत्री करा. मी पाठिंबा देतो आणि सभागृहात ठराव मांडतो. मला तुमच्यात दम बघायचा आहे. माझ्या पक्षाची हमी मी घेतो, असं आव्हान शिवसेना ( ठाकरे गट ) भास्कर जाधव भाजपाला दिलं आहे.
ज्याच्याबरोबर मैत्री कराल, त्याचं वाटोळं केल्याशिवाय राहत नाही, अशी टीकाही भास्कर जाधवांनी भाजपावर केली आहे. ते विधानसभेत बोलत होते.
“अजित पवार महाविकास आघाडी सरकारमध्ये होते. पण, काहींना सकाळ संध्याकाळ अडीच वर्षे खूप खुपत आहेत,” असं विधान भास्कर जाधवांनी केलं.
त्यावर, “अजित पवारांना मुख्यमंत्री केलं असतं, सगळंचं खुपलं असतं,” असं वक्तव्य विधानसभेत एका सदस्यानं केलं.
याला प्रत्युत्तर देताना भास्कर जाधव म्हणाले, “आता अजित पवारांना मुख्यमंत्री करा. मी पाठिंबा आणि सभागृहात ठराव मांडतो. मला तुमच्यात दम बघायचा आहे. माझ्या पक्षाची हमी मी घेतो. ज्याच्याबरोबर मैत्री कराल, त्यांचं वाटोळं केल्याशिवाय राहत नाही.”
