मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत शिवसेनेतील 40 आमदार आणि अनेक खासदारांनी जाणे पसंत केले. यानंतर शिंदे गटाने शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला आणि निवडणूक आयोगाने त्यांना तेही दिले.
सध्याच्या घडीला उद्धव ठाकरेंसोबत काही मोजकेच लोकप्रतिनिधी थांबले असतानाही त्यांना धक्के बसणं काही बंद होण्याचे नाव घेत नाही आहे. शिर्डीतील ठाकरे गटाचे माजी आमदार बबनराव घोलप यांनी आज थेट मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
ठाकरे गटाचे माजी आमदार बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बबनराव घोलप यांच्यात अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. बबनराव घोलप हे माजी आमदार आणि माजी मंत्री आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात शिर्डीत सुरु असलेल्या गृहकलामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेतला का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कारण बबनराव घोलप आज अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मंत्रालयात पोहोचल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिर्डी लोकसभा मतदारसंघावरुन गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात वाद सुरु आहे. त्यामुळे बबनराव घोलप हे ठाकरे गटात नाराज असून त्यांनी आपली नाराजी अनेकवेळा माध्यमांसमोरही व्यक्त करुन दाखवली आहे. याशिवाय त्यांनी आपल्या नाराजीच्या मुद्द्यावर पक्षश्रेष्ठींची भेटसुद्धा घेतली होती.
असे असतानाच आज त्यांनी अचानक एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना धक्का बसणार का? बबनराव घोलप शिंदे गटात प्रवेश करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
