छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील एका तलावात बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडलीय.
धक्कादायक बाब म्हणजे मृतांमध्ये दोन सख्खा भावांचा देखील समावेश आहे. त्यामुळे मृत मुलांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मुलांचे मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवले.
विश्वजितकुमार सुखदेव उपाध्याय (वय 12 वर्षे), अफरोज जावेद शेख (वय 12 वर्षे), अबरार जावेद शेख (वय 14 वर्षे), कुणाल अनिल दळवी (वय 12वर्षे) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चिमुकल्या चार मुलांची नावं आहे.
संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरात असलेल्या रांजणगाव शेणपुंजी परिसरात असलेल्या तलावात काही मुलं पोहण्यासाठी गेली होती. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने चार मुलं पाण्यात बुडाली. घटनेची माहिती मिळताच परीसरातील नागरिकांसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
सोबतच तहसीलदार देखील घटनास्थळी पोहचले. तसेच याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यांनतर अग्निशमन दलाने पाण्यात बुडालेल्या चारही मुलांना बाहेर काढले आहे. मात्र या चारही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मृत मुलांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
