मोठी बातमी! शरद पवार गटाला धक्का, बडा नेता भाजपात

आगामी निवडणुकांच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला (NCP Sharad Pawar Group) धक्का बसला आहे. मागील 35 वर्षांपासून विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात राजकारण करणारा शरद पवारांचा शिलेदार भाजपात दाखल झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संजय गरुड  यांनी पक्ष सभासदत्वाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यात चर्चांना उधाण आले असून राजकीय समीकरणेही काही प्रमाणात बदलणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावचे संजय गरुड हे गेल्या 35 वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात लढत आले आहेत. त्यांनी महाजनांविरोधात चार वेळा विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांना एकदाही यश मिळाले नाही. त्यात गेल्या काही दिवसापासून त्यांच्या पक्षातूनच कुरघोडीच्या राजकारणाला सामोरे जावे लागत होते. त्याशिवाय, विरोधी बाकांवर असल्याने त्यांच्या कार्यकर्त्याची कामे होत नसल्याने संजय गरूड त्रस्त होते.

अशातच अयोध्या राम मंदिर सोहळ्याच्या मिरवणुकीत काही वेळेसाठी सहभागी झालेल्या संजय गरुड यांना मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपामध्ये येण्याचा सल्ला दिला.मंत्री गिरीश महाजन यांच्या सल्ल्यानंतरचा मागचा पुढचा विचार न करता संजय गरुड यांनी आपल्या राष्ट्रवादी पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा पक्ष श्रेष्ठी यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

Leave a Comment