महाराष्ट्रातील ‘या’ ६ खासदारांची टर्म संपणार, निवडणूक जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरातल्या राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणुकांची घोषणा केली आहे. 27 फेब्रुवारीला राज्यसभा निवडणुकींचं मतदान पार पडणार आहे, यामध्ये महाराष्ट्रातल्या 6 जागांसाठी निवडणुका होणार आहेत.

महाराष्ट्रातून ठाकरे गटाचे अनिल देसाई, भाजपचे प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही मुरलीधर, काँग्रेसचे कुमार केतकर तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण यांच्या खासदारकीची मुदत संपणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम
या निवडणुकांसाठी 8 फेब्रुवारीला निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. 15 फेब्रुवारी ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असून 16 फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी होणार. 20 फेब्रुवारी पर्यंत अर्ज मागे घेता येणार. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. 29 फेब्रुवारी 2024 रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार आहे.

निवडणूक आयोगाने या निवडणुकीत मतदानासाठी विशेषत: जांभळ्या (Violet) रंगाचं स्केच पेन वापरण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच, निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यासाठी पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्याचे तसेच, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याबाबतचेही त्यांच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Leave a Comment