PSI ची नोकरी नाकारून बिरेवाडीचे पांडुरंग गळंगे झाले शिक्षण विस्तार अधिकारी

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील पांडुरंग रेवजी गळंगे यांनी जिल्हा परिषद पदभरतीत आयबीपीएस परीक्षेत 200 पैकी 170 गुण मिळवून 1310 उमेदवारांमधून प्रथम क्रमांक मिळविला आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये जिल्हा परिषद पदभरती आयबीपीएसची परीक्षा झाली होती.

नुकताच या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परिक्षेत पांडुरंग गळंगे यांनी घवघवीत यश मिळविले आहे. तसेच त्यांची पालघर येथील जिल्हा परिषदेत शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून निवड देखील झाली आहे.

पांडुरंग गळंगे हे एका सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यांचे बंधू पोपट गळंगे सोसायटीत सचिव म्हणून काम बघत आहे. दरम्यान पांडुरंग गळंगे यांचं प्राथमिक शिक्षण संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यानंतर बारावी पर्यंतचे शिक्षण साकूर येथील वीरभद्र विद्यालयात झाले.

शिक्षण पुर्ण झाल्यानंतर 2007 साली ते हिवरगाव पठार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले. 2018 नंतर खैरदरा (नांदूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सेवा केली. सध्या पिंपरणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर कार्यरत आहेत.

शिक्षण सेवा करताना पांडुरंग गळंगे यांची 2011 साली पोलिस उपनिरीक्षक पदी निवड देखील झाली होती पण ती नोकरीच त्यांनी नाकारली. 2020 साली MPSC ची STI व कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा दिली पण तिथे थोडक्यात त्यांना अपयश आले. तसेच 2022 साली राज्य सेवा मुख्य परीक्षा दिली पण तेव्हाही थोडक्यात अपयश आले.

पांडुरंग गळंगे शिक्षक असतानाही विविध परीक्षा देत आहे. पण जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आज त्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. त्यांच्या या यशाबद्दल राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, मा.आ. डॉ. सुधीर तांबे, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, साकूर सोसायटी चे चेअरमन इंद्रजित खेमनर यांनी श्री. गळंगे यांचं अभिनंदन केले.

तसेच साकूर पठारभागासह संगमनेर तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

Leave a Comment