राज्यातील राजकारणात विखे विरुद्ध थोरात असा सामना नेहमीच रंगतो. दोघांकडूनही एकमेकांवर टीकेचा बाण सोडले जातात. असे असतानाच आता पुन्हा एकदा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात असा सामना रंगण्याची चिन्हं आहेत.
कारण, विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांचं नाव घेता त्यांच्यावर जहरी टीका केली आहे.
शिवजयंतीनिमित्त महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील राहता शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.
यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारीदेखील मिळाली आहे. या पक्षप्रवेशाबाबत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला.
यावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, भाजपमध्ये कुणाला प्रवेश द्यायचा हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. काही लोकांनी थेट भाजपमध्ये येण्याची भूमिका घेतली. मात्र नगर जिल्ह्यातील काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरतात, असं म्हणत विखे पाटील यांनी नाव न घेता बाळासाहेब थोरात यांना टोला लगावला.
