राष्ट्रवादीला धक्का ; बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत ‘या’ बड्या नेत्याचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई : शहरात काही मंडळींनी किरण काळे हटावचा नारा दिला असताना काळे यांनी मात्र काँग्रेस बढावची मोठी खेळी केली आहे. पहिल्यांदाच काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीतून बड्या ज्येष्ठ नेत्याचा प्रवेश काळे यांनी घडवून आणला आहे.

राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष, माजी नगरसेवक संजय झिंजे यांनी मुंबईत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते काँग्रेसचा झेंडा स्वीकारत पक्षप्रवेश केला आहे. राष्ट्रवादीला शहरात हा मोठा धक्का मानला जात आहे.

झिंजे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांच्या मान्यतेने व ओबीसी राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अजय सिंग यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. शहरात ओबीसींची संख्या लक्षणीय आहे. काँग्रेसने या घटकांची मोट बांधण्यासाठी कंबर कसली असून त्यांना एकत्रित करण्यासाठी झिंजेंना ओबीसी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण्यात आले आहे.

तसे नियुक्तीपत्र ओबीसी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्या हस्ते पक्षाच्या मुंबईतील गांधी भवन येथील कार्यालयात देण्यात आले आहे. यावेळी काळे यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे, राष्ट्रीय सहसमन्वयक मंगलताई भुजबळ, अल्पसंख्यांक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला उपस्थित होते.

Leave a Comment