निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यावरून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. त्यातच आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाकडून त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले…
आज मुंबईत महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी ठाकरे म्हणाले की, माझ्यावर नेहमी घरी बसून सरकार चालवले गेले असा आरोप केला जातो. कारण तेव्हा करोनाची (Corona) परिस्थिती होती. त्यामुळे मी घरी बसून सरकार चालवलं. मी घरी बसून जे केलं, ते सूरत-गुवाहाटीला जाऊन जमलं नाही, असे ठाकरेंनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, मला अनेक जण विचारतात, जेव्हा हे आमदार बंड करत होते तेव्हा तुम्हाला कळले नाही का, हो मला कळले होते, मी त्यांना कशाला थांबवू, जे विकले गेलेले आहे. त्यांना सोबत घेऊन कसे लढणार. विकलेल्या माणसांना सोबत घेऊन लढू शकतो.
मी दार उघडं ठेवले होते. ज्यांना लढायचे आहे, त्यांनी थांबावे, बाकीच्या लोकांनी निघून जावे. कारण, ते शिवसैनिक असू शकत नाही. अशी लाचारी मी पत्कारली नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
