राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या ७० टक्के मागण्या मान्य केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्या मान्य झाल्याच्या सरकारच्या निवदेनाची प्रत दिली आहे.
त्यामुळे आम्ही लाँग मार्च(Long March) स्थगित करत आहोत, अशी घोषणा माजी आमदार जेपी गावित यांनी आज (दि. १८) केली. दरम्यान, माजी आमदार जेपी गावित, जिल्हा प्रमुख, जिल्हाधिकारी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे पाच दिवसांच्या लॉन्ग मार्चनंतर शेतकरी (Long March) माघारी फिरणार आहेत.
यावेळी माजी आमदार गावीत माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, शेतकऱ्यांनी १७ मागण्या केल्या होत्या. यापैकी काही मागण्यावर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. तर काही मागण्यांची एक महिन्यानंतर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
काही मागण्या केंद्र सरकारशी संबंधित आहेत. त्याचा केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. त्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आम्ही आंदोलकांना विश्वासात घेतले. त्यानंतर आता आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचे गावित यांनी सांगितले.
