संगमनेर – जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यामध्ये आरोग्य कार्मचाऱ्यांसह प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षकांचाही सहभाग आहे.
शिक्षकांनी संप पुकारल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यातच काही दिवसांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी गावठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन शिक्षकांनी (सोमवार दि. २०) शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिक माहिती अशी की, साकूर जवळील बिरेवाडी येथील गावठाण येथे पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे. अध्यापनासाठी या शाळेत ३ शिक्षक व १ शिक्षिका कार्यरत आहेत. तसेच जवळपास ९० हून अधिक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. परंतु जुनी पेन्शन लागू करण्यासाठी राज्यातील प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षकांनी संप पुकारला आहे. जो पर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत संप चालूच ठेवण्यावर ठाम आहे. शिक्षक संपावर गेल्याने सर्व शाळांना कुलूप आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच बिरेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील २ शिक्षक संपात सहभागी झाले असून उर्वरित २ शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आजपासून शाळा सुरू केली आहे. एकीकडे संप सुरू असताना शाळा सुरू करण्याच्या घेतलेल्या या निर्णयाच ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
