शेतात काम करताना वीज कोसळून दोघांचा मृत्यू 

मराठवाड्यासह विदर्भात पावसाने झोडपून काढले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 दिवसांपासून पावसाने धुमशान घातले आहे. अशातच वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

वादळी वाऱ्यासह अवकाळी कोसळलेल्या मुसळधारेमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हाभरात गुरूवारी आणि शुक्रवारी जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील अंबड टाकळी इथं आज दुपारी शेतात काम करत असणाऱ्या एका 60 वर्षीय व्यक्तीवर वीज पडून मृत्यू झाला आहे.

जावेद शेख असं या व्यक्तीचं नाव आहे. दुपारी नेहमी प्रमाणे जावेद शेख हे शेतामध्ये काम करत होते. पण अचानक पाऊस सुरू झाला. त्याच दरम्यान अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं.

तर दुसरी घटना ही सिल्लोडच्या उडणगाव शिवारात घडली आहे. सुधाकर धोंडीराम पाचे (वय 25) असं मृत तरुणाचं नाव आहे. शेतात काम करत असताना अचानक विज कोसळली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे 2 जणांचा मृत्यू झाल्याची पहिली घटना घडली आहे.

Leave a Comment