संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील काही दूकानदारांना एका तोतया अधिकाऱ्याने दिवसाढवळ्या गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे दूकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र काही तासांतच सुज्ञ नागरिकांनी तोतया अधिकाऱ्याचा पर्दाफाश करत चांगलाच चोप दिला.
सविस्तर बातमी अशी आहे की, साकूरमध्ये चौफुलीवर शुक्रवारी दुपारी साधारणपणे ३ ते ३.३० वाजेच्या सुमारास एका दुचाकीवरून एक व्यक्ती आला होता. तसेच किराणा दुकान व टपरीवर जात मी अन्न व औषध प्रशासन विभागाचा अधिकारी आहे असे सांगून दुकानाची मालाची चौकशी करायची आहे असे सांगितले. त्यामुळे दूकानदार घाबरून गेले होते. तसेच काही दूकानदारांकडून त्या तोतया अधिकाऱ्याने ८ हजार, २ हजार रुपये असे पैसे घेतले होते. पैसे घेतल्यानंतर दूकानदारांना वेगळाच संशय आला होता. त्यामुळे काही सुज्ञ नागरिकांना ही बातमी समजल्यावर त्या तोतया अधिकाऱ्याची माहिती घेतली.
तसेच तो तोतया अधिकारी एक एक दूकानात जाऊन गंडा घालत होता. बिरेवाडी रोडने तो तोतया अधिकारी मोटारसायकलवरून आश्वीकडे जात असताना रस्त्यावरच एका दूकानात पैसे मागत होता. तोपर्यंत त्या तोतया अधिकाऱ्याचा काही नागरिकांनी पाठलाग केला. शेवटी तोतया अधिकाऱ्याचा पर्दाफाश केला. आणि तोतया अधिकारी नागरिकांनी चांगलाच धूतला. शेवटी ज्यांचे पैसे घेतले त्या दूकानदारांचे पैसे परत दिले गेले. परंतु साकूरमध्ये या तोतया अधिकाऱ्याची चर्चा चांगलीच सुरू आहे.
