पिंपरी : घरी लग्नाची धामधूम सुरू असताना नवरदेवाने लग्नाच्या दिवशीच आत्महत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडलीय. घरात नातेवाईक, पाहुणे मंडळींची लगबग सुरू असताना नरदेवाने पहाटे विहिरीत उडी मारून जीवन संपवलं. त्याआधी मला लग्न करायचे नाही असा मेसेज पाठवला. मंगळवारी पहाटे घडलेल्या या प्रकाराने कुटुंबियांना धक्का बसला आहे.
याबाबत मिळालेली माहिती असी की, सूरज रायकर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. तो तळेगाव दाभाडे इथं राहत होता. मंगळवारी त्याचं लग्न होतं. लग्नाची धामधूम घरात सुरू होती. सकाळी लवकर त्याने मामाला फोनही केला होता. त्यानंतर तो घरातून बाहेर पडला. त्याने मला लग्न करायचं नाही असा मेसेजही मामाला पाठवला होता. बराच वेळ तो न परतल्याने कुटुंबियांनी शोध घेतला. त्याची दुचाकी आणि मोबाईल विहिरीजवळ आढळले.
घराजवळच असणाऱ्या विहिरीत उडी मारून सूरजने जीवन संपवलं. लग्नाच्या दिवशीच सूरजने असा निर्णय का घेतला हे अद्याप समोर आलेलं नाही. त्याच्या आत्महत्येने आनंदी वातावरण असलेल्या लग्नघरात शोककळा पसरली. सोमवारी रात्री त्याने आपल्या लग्नाचे आमंत्रणही अनेकांना फोनवरून दिलं होतं.
देहूगाव इथं सरस्वती मंगल कार्यालयात मंगळवारी सायंकाळी लग्न असल्याचं त्याने मेसेज आणि फोनवरून सांगितलं होतं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचाच मृतदेह विहिरीत आढळल्याने मोठी खळबळ उडाली. लग्नाऐवजी त्याच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्याची वेळ नातेवाईकांवर आली.
