माजी मंत्री आणि भंडारा – गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. बुधवारी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला असून यातून परिणय फुके थोडक्यात बचावले आहेत.
सध्या लोकसभा निवडणुकी रणधुमाळी सुरू आहे.यादरम्यान परिणय फुके हे मंगळवारी रात्री भंडारा लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे करडगाव येथे गेले होते. त्यानंतर गावकऱ्यांशी चर्चा आटोपून रात्री उशिरा ते लाखनी येथे परत येत असताना रात्री दोन वाजताच्या सुमारास त्यांचा अपघात झाला.
साकोलीजवळ एक अज्ञात वाहन डॉ. फुके यांच्या वाहनासमोर आले त्याचवेळी त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाने महामार्गावरील दुभाजकाला धडक दिली. मात्र, अपघातानंतर अज्ञात वाहनचालकाने तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. वाहनात प्रवास करणारे सुरक्षा रक्षक आणि इतर सहकारीही जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले. यानंतर हा अपघात होता की घातपात? अशी भीती व्यक्त केली जात आहे.
