रामभक्त हनुमानाने लंकेचे दहन केले. उद्या हनुमान जयंती आहे. त्यानिमित्ताने मतदारांनी विरोधकांच्या लंकेचे दहन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी नौटंकी करून कोणी निवडून येऊ शकत नाही. त्यासाठी काम करावे लागते, असा टोला विरोधी उमेदवाराला लगावत डॉ. सुजय विखे यांचा विजय पक्का असल्याचा विश्वासही व्यक्त केला.
एकनाथ शिंदे म्हणाले की, उमेदवार सुजय विखे पाटील यांचे पणजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी या देशात सहकाराचे बीज रोवले आहे. स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याचा वटवृक्ष केला. आता या परंपरेचा वारसा डॉ. सुजय विखे पाटील पुढे चालवत आहेत. लोकसभेत या मतदार संघातील किंबहुना राज्यातले प्रश्न देखील ते मांडतात. येथील मतदार देखील सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवारांच्या पाठीशी उभे राहतात, हा इथला इतिहास असून डॉ. सुजय यांच्या नावातच जय आहे. त्यामुळे त्याचा पराजय होऊ शकत नाही, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
या मतदारसंघातून सुजय विखे पाटील तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार आहेत. त्यामुळे इथे “नो लंके ओन्ली विखे” अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नगर जिल्ह्यात सहा आणि नाशिक जिल्ह्यात एक अशा सात तालुक्यामध्ये 122 गावांना आपण पाणी दिले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजण्याची जबाबदारी सुजय विखेंवर आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
