काँग्रेसला मोठा धक्का, महाराष्ट्रातील बड्या नेत्याच्या ‘या’ निर्णयामुळे खळबळ

लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांकडून प्रचाराला जोरात सुरूवात झाली आहे. महायुती आणि महाविकासआघाडीकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत, पण प्रचार ऐन रंगात आलेला असतानाच काँग्रेसला धक्का बसला आहे.

काँग्रेस नेते मोहम्मद आरीफ नसीम खान यांनी आपण काँग्रेसचा प्रचार करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. नसीम खान यांनी याबाबतचं पत्र काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिलं आहे. नसीम खान यांची काँग्रेसने स्टार कॅम्पेनर म्हणून नियुक्ती केली होती.

महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकासआघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. अनेक मुस्लिम संस्था आणि पक्ष कार्यकर्त्यांना काँग्रेस निदान एकतरी मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवेल, अशी अपेक्षा होती, पण दुर्दैवाने काँग्रेसने एकही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलं नाही. काँग्रेसला मुस्लिम मतं पाहिजे आहेत, पण उमेदवार नको का? असा प्रश्न विचारला जात आहे. मी या प्रश्नाचं उत्तर मुस्लिम जनतेला देऊ शकत नाही, त्यामुळे मी या निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणार नाही, असं नसीम खान यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

याचसोबत नसीम खान यांनी आपण काँग्रेसने दिलेल्या स्टार कॅम्पेनर पदाचाही राजीनामा देत असल्याचं सांगितलं आहे. आपण महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात मतदान करणार नाही, असं नसीम खान यांनी स्पष्ट केलं आहे.

Leave a Comment